रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

"शोध"-
धुलाक्षरे गिरवता गिरवता,
कधी पोहचले पुस्तकांच्या राज्यात ,
कललचं नाही..।
अंकलिपीच्या राज्यातून,
शब्दांच्या दुनियेत पाय ठेवला 
अन खुले झाले आकाश 
माझेचं मला..।
शब्दांच्या अनेक छटा भाव,
क्षितीज्यापल्याडचा अर्थ..
ओन्जल भरुन देत आहे,
जीवनाला अर्थ..।
तिथपासून इथपर्यंतचा प्रवास 
अगदीचं विभीन्न..
कधी अडखलून पडतांना,
शिकले सावरायला राहून प्रसन्न..।
गोष्टी,कथा,कोडी,विनोद,कांदबर्र्या,नाटके चरित्रे,विचारशिल्पे.
.वाचता वाचता वाचू लागले माणसे,
माणसांचे चेहरे,त्यांची मने..।
अन आता शोधतेय स्वतःचं स्वतःला,
अनिमीष..अविरत अव्याहतपणे..।।
-रो

"पाऊस"-
तो असाचं असतो..
कधी रुसणारा,
कधी रडविणारा..।
पण खात्रीने,
एकदा तरी बरसणारा..
अन बरसला की,
ओलाचिंब करणारा..
अगदी मनाच्या चोरकप्प्यापर्यंत..।।
-रो..

कधी कधी वाटे,
फुकाचा आटापीटा हा 
फुकाचाचं संदेह..।
पाना फुलासारखाचं,
ओघलेलं आपलाही देह..।।
म्हणूनीया या देहाचे,
सोवले ओवले कशाला..।
इतरांना आनंद देत,
प्रत्येक क्षणास सजवा..।।
-रो..

समाधान.."
तू ऐकणार नाहीस माहीत असूनही,
सांगत असते पुन्हा पुन्हा..
कारण ध्यासचं घेतलायं ,
तुला घडविण्याचा..।।
काही ना काही शोधण्यासाठी,
तुझं धडपडणं..
वैतागून सारं काही ,
बाजूला फेकून देणं..
त्याचवेली माझ तुला ,
चुचकारतं रहाणं पुन्हा पुन्हा..।
कारण ध्यासचं.......।।
तुझं प्रश्नांचं भेंडोल,
उत्तरासाठी ते आशेनं पहाणं.'
तुझं उत्तर तुचं शोध',
 उठणार्या वलयांची ,
जाणीव आहे मला..
तुझ्या हरवण्याच्या नेमक्या जागाही,
ठाऊक आहेत मला..
तरीही नाही अडवत
, तुला आता पुन्हा पुन्हा..।
कारण ध्यासचं.......।।
तू शोध तुझी ,
स्‍वतंत्र वाट..
तू बनवं ,
तुझीचं पाऊलवाट..
काट्यांची असेल आता कदाचीत,
होईल हिरवीगार तुझ्या श्रमाने..
आनंद देईल तुलाही अन इतरांनाही..
तुझ्या उत्तूंग कतृत्वाने,
मिलेलं मलाही समाधान..।
कारण ध्यासचं......।।-रो.. 

.. 

"समर्पित प्रीती.." 
 आली आकाशाला दया,
घाली मायेची पाखर..।
निस्तेज म्लान धरतीला,
फुटे सृजनाचा अंकुर..।। १।।
वाराही खट्याल,
आलिंगन देवू पाहे..।
हलक्या गार झुलकीने,
वृक्ष वेली हेलकावे..।।२।।
मेघाने घातली साद,
बरस बरस बरसला..।
हातचे काहीही न राखता,
सहस्रकरांनी झुकला..।।३।।
शुर्चिभूत होवूनिया,
सृष्टीने दिला प्रतिसाद..।
दान पदरात झेलले ,
नको वाद प्रतिवाद..।।४।।
हसू फुटे किरणाला,
तोही हलके प्रकाशे..।
सात रंग घेवूनिया,
चित्र काढीतो आकाशे..।।५।।
समर्पित प्रीतीच्या,
नूतन खाणाखूणा..।
सजते नटते धरती,
म्हणूनिया पुन्हापुन्हा..।६।।
रो.

"ह्रदयीचा सूर.." 
नाहीचं जमायचं मला ,
दाटलेला मेघ होणं..।
जलधारा अडवून,
मनातल्या मनात कुढणं..।।१।।
धरती कशीही असो,
खडकाल अगर ओलेती..।
मी मात्र बरसणारं,
दिन अन राती..।।२।।
ज्याला भिजायचंय,
तो होईल धुंद..।
झेलूनी प्रत्येक थेंब,
सेवेल मृदगंध..।।३।।
नाही जोडायची मला,
खडकांशी नाती..।
जैसी त्यांची गती,
तैसेची प्रगती..।।४।।
येईल नवा पूर,
रुजतील बिजांकूर..।
गातील दिशा,
छेडूनी ह्रदयीचा सूर..।।५।।
-रो..

"प्रवासी.." 
ज्याची त्याची वाट वेगली,
ज्याचा त्याचा थांबा..।
 क्षणांचेचं सोबती सारे,
हलूचं गाठोडं बांधा..।।१।। 
 वेड्यावाकड्या वलनांना,
एकमेकांचा आधार..।
वलूनी जाता कोपरा,
उरात भरे कापरं..।।२।।
उतरणीच्या प्रवासाला,
असू द्या हातात हात..।
पायथ्याशी पोहचता,
टाकावी लागेल कात..।।३।।
 येईल वार्याची लाट,
घेवून जाईल दूर दूर..।
 अनंताचा सारे प्रवासी,
कशास हवी कुरबूर..।।४।।
-रो..

"उनाड पंख..!!" 
 आभालचं वेचू गेले,
पंख उनाड वेडे..।
थेंब थेंब बरसले,
डोल्यातून क्षण खुले..।।१।।
खुले क्षण अजूनही,
भिर भिर पिंगा घालतात..।
विणा छेडूनी ह्रदयाची,
नातं आपुले सांगतात..।।२।।
कसं थोपवू या,
आभालाच्या निलाईला..।
आसवांची रिमझीम
 अन एकांत सोबतीला..।।३।।
स्वप्न होते निले,
त्यावर सुंदर नक्षी..।
विखरुनी जाता सारी,
दूर गेला पक्षी..।।४।।
आता नाही तुझ्या ,
परतीच्या कुठेचं खुणा..।
आता सोबत पंखाची,
त्यावरी रिता निलेपणा..।।५।।
-रो..

"पुकारा.."
 रिकामा होत जाई ,
गगनाचा गाभारा..।
अवनीवरी हिरव्या,
नवलाईचा पसारा..।।१।।
धुंद गगनाचा,
बेधुंद खेल सारा..।
परतीच्या प्रवासाचा,
ठेवू पाहे किनारा..।।२।।
नको होवू विरहव्याकूल,
गगनाचा पुकारा,
जिव गुंतला तुझ्यात,
सांगे येईनं दुबारा..।।३।।
-रो..

रोजचचं झाल की,
आयुष्य थकतं..।
तेव्हाचं स्वल्पविरामाचं,
महत्व कलतं..।।
दुर्लक्ष करणं हे,
दुःश्चिन्ह ठरतं..।
पूर्णविरामास ते,
आमंत्रण देतं..।।
-रो..

गुंफिलेले धागे..
  व्याकुल वेदनेत जेव्हा,
आपले साथ देतात..।
उन्हाचे रुक्ष क्षणही,
सुखद गारवा होतात..।।१।।
गुंफिलेले धागे जेव्हा,
आधार होतात..।
असुरक्षीत भावही ,
कुठल्या कुठे पलतात..।।२।।
सुखद स्वप्ने जेव्हा,
पसायदान मागतात..।
जाणिवांची स्पंदने,
मधूर गीत गातात..।।३।।

भक्त..
रुढी-रिती-पंरपंरा ,
ह्यांची झुगारुनी बंधने..।
एकतेचे बीज रोवा,
मोडा सारी कुंपणे..।।१।।
मानवजात इतुकी एकचं,
धर्म माणुसकीचा..।
द्या अन घ्या पुरता,
ध्यास ममत्वाचा..।।२।।
तोडा सार्या शृंखला,
व्हा अवघेची मुक्त..
।मानवतेचे चित्र गहिरे
,एकत्वाचे होवू भक्त..।।३।। 
-रो..

वाटा..
क्षितीजाच्या बाहूतून आल्या,
वत्सल सुंगधी धारा..।
पितृ ह्रदयाने जोजवी,
हा मंद संथ वारा..।।१।।
नभागंण पाहे वलूनी,
संवादे सृष्टीला..।
निरोपाचा क्षण जवली,
सावरे तू विपूला..।।२।।
दिव्यत्वाचे देणे दिधले,
दिधल्या रसरंग छटा..।
अंतरंगी फुलतांना शोध,
नव्या उन्मेषाच्या वाटा..।।३।।
-रो..

टाके..
उलट अन सुलट,
 सारेचं टाके घालायचे..। 
घालतांना मात्र,
 उसवणीचे नियम पालायचे..।।
 प्रत्येक धाग्यात बंध,
 निर्मलतेचे बांधायचे..।
 वस्राइतकेचं टाक्यानांही,
 आपुलकीने जपायचे..।।
-रो.. "

"आरंभ.. "
सारे आरंभ पवित्र,
मंगल कर्माचे..।
श्वासात भरुनी घेवू,
क्षण चैतन्याचे..।।
सारे मिळूनी जावू,
कल्पना दरबारी,
मांडू या शब्दपूजा,
सांधू वास्तवता दरी. .।।
नविन आशा नवा उत्साह,
ह्रदयात साठवू..।
मेघ बनूनीया,
हलके हलके बरसत राहू..।।
रो..

सावली..
कधी मागे रहाते,
कधी पुढे जाते..
कधी पायाखाली चिरडून,
दिसेनाशी होते..
पण, सतत निमुटपणे,
सोबत चालते..।।
रो..

 "जीवनाचे सार.. "
घालावी लागते,
मायेची पाखरं.।
द्यावा लागतो,
निष्कपट आधार..।।
फुलासारख्या,
नाजूक मनाला..।
सोसत नाही,
व्यवहाराचा भार..।।
रक्ताळलेल्या काळजालाही,
झेलावा लागतो वार..।
तिथेचं गवसते,
सुखी जीवनाचे सार..।।
रो..

"पाचोळा.."
पिकल्या पानांचा पाचोळा,
फिरे गरागरा..।
सगळीकडे सांडला,
फुकाचा पसारा..।। १।।
आवरु गेले आवरेना,
उडतो भरारा..।
हुडकतो जणू तो,
ओलसर उबारा..।। २।।

नियतीचा असे,
नेमाचाचं फेरा..।
सोसतो मूकपणे,
वेदना त्या सार्या..।। ३।।

एका आशेवर होई,
स्थिर तो जरा..।
नाजूक पल्लवीचा उपहार,
देतील श्रावणधारा.. ।।४।।

रो..

'धागा.. '
माळेचे मणी,
गेले ओघळून..।
इकडे तिकडे,
गेले विखरून..।।
शेवटी राहीला,
धागाचं उरून..।
सांधत रहातो,
मूग गिळून..।।

रो..

'अवकाळी..'
एक उदास पाऊस,
डोळीयात दाटला..।
झुंजार वादळाने,
घात पुरता केला..।।
भिरभिर पिंगा घालुन,
तांडव नृत्ये नाचला..।
डोळीयातला पाऊस,
अवकाळी ठरला..।।

-रो..

नसेल असेल..
नसेल मी कुणीतरी,
परि असेल मी कुणीतरी..।
विश्वसागराच्या पसार्यात,
चमकेल माझा बिंदू उरी..।।
माझी धडपड माझी पडझड,
कधी निस्तब्ध कधी होणे अवखळ..।
हसवेल तुम्हा निमीषार्ध तरी,
चमकेल माझा बिंदू उरी..।।
माझे रुजणे माझेचं फुलणे,
वसंतबहार होवून झुलणे..।
वदेल तुम्हास कहाणी सारी,
चमकेल माझा बिंदू उरी..।।
स्वप्नात हरवणे सत्यात जगणे,
माणुस निपजताचं पुढे चालणे..।
आनंदवाट माझी सदाचारी,
चमकेल माझा बिंदू उरी..।।
रो..

'शेत..'
कुंपणानंच शेत खाल्ल तर,
शेतानं कुणाकडे पहायचं..?
बुजगावण्यानं तरी,
तिष्ठत किती उभं रहायचं..?

गोफणीनं तरी मेलं,
किती वेळ फिरायचं..?

शेतानंच आता शेताचं,
स्वतःचं राखून करायचं..।।

रो..

वेदना..'
आसुडाचे वार,

सोसले कळ्यांनी..।
उमलण्याआधी निर्माल्य,
झाली शब्दवाणी..।।
आक्रंदन त्यांचे,
ऐकले ना कोणी..।
निस्तब्ध होत गेली,
आभाळ कहाणी..।।
हुंदके हंबरडे,
ना पोहचले कानी..।
मन-बुध्दी-आत्माही,
ठेविला गहाणी..।।
आता कैसी आळवावी,
सुरेल गाणी..।
येते फक्त भरुनिया,
डोळा पाणी..।।
आरोप-प्रत्यारोप उरले,
विश्वाच्या ठिकाणी..।
ती वेदनाचं झाली,
बहु ओशाळवाणी..।।
रो...

'हिंदोळा.. '
आठवणींचा हिंदोळा,
हलला झुलला..।
आभाळी शिंपतांना,
भुईला भिडला..।।
हिंदोळा झुलतांना,
हललं काळीज..।
फिरुन तीचं नवाळी,
डोकावे आज..।।

नवाळीची नऊ पाने,
झाली खाली वर..।
आभाळ भेटे भुईला,
हिंदोळ्याचा चमत्कार..।।

रो..


आवाज..
माणसांना दिला आवाज,
कोणी ना फिरकले..।
गिधाडांना आवाज देताचं,
सारे गो़ळा झाले..।।
असे कसे घडले,
असे कसे झाले..?
प्रश्नाचे उत्तर ,
अधुरेचं राहिले..।।

रो..

घरटे..'
चिमुकल्या पाखराला,
घरटे भासे उबदार..।
चिऊच्या पंखाखाली,
दडे ते वारंवार..।।
वाटे ना त्याला कधी,
भीती वादळवार्याची..।
चिऊ नसे तेव्हाही,
सोबत असे घरट्याची..।।

संध्याकाळी कातरवेळी,
चिऊ येई झडकणी..।
इवल्याश्या चोचीत,
प्रेम भरे चारापाणी..।।

बाळ माझे नको,
कुठेचं कमी पडाया..।
शिकवे त्याला ती,
हवेमध्ये तराया..।।

आकाशी झेप घेत,
उडे पाखरु भरारा..।
पंखात शिरला जणू,
झंझावाती वारा..।।

बाळाचे कौतूक चिऊ,
अनिमीष पाही..।
पिंजरा वाटे घरटे,
पाखरु उडून जाई..।।

नको रे नको पाखरा,
परंतु तू घरट्याकडे..।
सय राहू दे अंतरात,
इतकेचं घालते साकडे..।।

रो..

'बाभूळ..'
बाभळीचं झाड,
काटेरी अलिप्त..।
सृष्टीच्या पसार्यात,
उभा सज्जन विरक्त..।।
सोसे वादळवारा,
कधी उन्हाची काहीली..।
परि सावली तयाची,
जणू मायेची माऊली..।।

काटे असती बहू,
सारे त्याजती बंधन..।
राखण करे शेताची,
मुके बनुनी कुंपण..।।

रो..

'अजूनही मी लहान आहे..'
एक खूप छान आहे,
अजूनही मी लहान आहे..।
ना अपमानाची खंत,
ना मानाचा भार वाहे। अजूनही..

कोणी असो कितीही मोठा,
माझे स्थान छान आहे..। अजूनही..

मोठ्यांच्या मोठ्या मोठ्या गप्पा,
छोट्या गोष्टीत रममाण आहे। अजूनही..

कुणास वाटे ईर्ष्या असूया,
क्षणिक रुसण्यात हसणे आहे..। अजूनही..

खरचं खूप छान आहे,
अजूनही मी लहान आहे..।। लहान आहे..

चांदणं..
मध्यान्हीला क्षितीजास,
रजनीनं वेढलं..।
मृदुल तरल चांदणं,
नभी पहुडलं..।।
हसलं लाजलं,
अवघं बहरुन आलं..।
जातांना ओंजळीत,
चैतन्य रेखून गेलं..।।
रो..

"दगड.."
निरागस डोळ्यांची उघडझाप,
शोधत असते मला..
इथे तिथे अन् त्या तिथे,
पलिकडेही..
चिमुकल्या मुखातिल स्वर,
साद घालतात मला..
अव्याहतपणे अविरत,
अखंड..

नाजूक उबदार स्पर्श,
खुणावित असतात मला..
कुशीत घेण्यासाठी,
सदैव सतत..

पण,
माझे डोळे अंधत्वाकडे झुकलेले..
कान कंठत्वेषाने किटलेले..
चेतनेचे नाजूकपण हरवलेले..

मला काहिचं ना कश्याचे..
अन्ती उरलो फक्त मी,
एक संवेदनाहीन दगड..

फक्त दगड..
दगड..

रो..

'ज्याचे त्याने..'
कसले कर्म अन् कसला धर्म,
शोधावे मर्म ज्याचे त्याने..।
ओंजळीत पाणी कितीसे उरले,
थेंब मोजावे ज्याचे त्याने..।

उन्हाची काहीली जीव कासावीस,
सावलीस स्पर्शावे ज्याचे त्याने..।

जीवीताचा ध्यास नयनांची आस,
करावा अभ्यास ज्याचा त्याने..।

काळोखभिन्न रात्र ही मोठी,
प्रकाशित व्हावे ज्याचे त्याने..।

सांगाती असती अनेक बहुत,
अंती चालत जावे ज्याचे त्याने..।।

रो..

मूकदोस्त..
सारेच दोस्त माझे..
सुंदर देखणे..
गालात हसणारे..
मूकपणे रडणारे..
हातात हात घालून चालणारे..
एकांतात सोबत करणारे..
कुणी कुणी आले..
गोड गोड बोलले..
एकएकाला हातात हात घालून नेले..
सहजचं परतीच्या बोलीवर..
फळीवरची जागा पडलीये रिती..
आत दाटलेल्या रितेपणासारखी..
उदास.. भकास..
रो..

सावली.. 
माझीचं सावली,
मला परकी..
मी इकडे,
तर ती तिकडे..
मी तिकडे,
तर ती इकडे..
देह अन् आत्म्याच्या,
सीमारेषा भेदून..।।
- रो..

'सत्कर्म..'
दूध विरजता होई,
दही तूप लोणी..
फिरुन दूध नाही,
ही निसर्गाची वाणी..।
नसे रुचकर चव,
नासक्या दूध पदार्थाची..
वेळ निभाव नेणे,
इतक्या हलक्या प्रतीची..।

शुद्ध दूधाचे पदार्थ,
मिरवीती हलवाई दुकानी..
लग्नकार्यात मानसन्मान,
प्रतिष्ठेची मेजवाणी..।

तेसे आयुष्य मोलाचे,
सत्कर्म करीत जावे..
पुन्हा मागे फिरणे नाही,
हे कोरावे स्वयंमने..।।

रो..

प्रतिबिंब..
पाण्यातलं प्रतिबिंब,
तुडुंब न्हालं..
बघता बघता,
पल्याड गेलं..
खोल गर्तेत,
स्थिर झालं..
स्वतःलाचं त्याने,
गाडून घेतलं..।।
- रो..

नश्वर..
होईल एक दिनी,
तुझी नुसतीचं राख..।
येतील सांगाती,
उभे राहण्या तटस्थ..।।
नश्वर ही काया,
जाईल विरुनी..।
कोण कोणासाठी,
रहातो बसोनी..।।

जगती जे भोगास्तव,
ते असती गिधाडे..।
तू तर मानव,
उघड आत्म्याची कवाडे..।।

माणुसकीचे स्तंभ रोवूनी,
झिजव कांतीमती..।
दशदिशा गात राहतील,
अहा, तुझीचं महती..।।

रो..

प्रेम..
प्रेमाने जग जिंकता येतं,
असं म्हणतात..
पण, प्रेमाला लोक,
कितीहो घाबरतात..।
दोन शिव्या दिल्या तर,
लाखोली वाहतात..
प्रेमाने शब्द वदता,
मूकपणे निघून जातात..।

खरे प्रेम खोटे प्रेम,
कितीहो वाद घालतात..
शेवटी खोट्या प्रेमालाचं,
खरे माणून जगतात..।

प्रियकर प्रेयसी मधील,
प्रेमालाचं प्रेम समजतात..
आई वडील मैत्री भावंडे,
यांच्या प्रेमाला मुकतात..।

वात्सल्य माया जिव्हाळा,
ही प्रेमाचीचं रुपे..
कोणतेही रुप अजमवा,
आनंद मिळतो सुखे..।

प्रेम द्या प्रेम घ्या,
प्रेमाला प्रीतीने भिजवा..
प्रेमाचा आनंदोत्सव करणार्यांची,
जमात सुखे वाढवा..।।

रो..

तारू..
स्वार्थबुद्धीला असते,
सत्याचे वावडे..।
जे जे फायद्याचे,
ते ते तिजला दिसे..।।
वळण करीतसे वाकडे,
पूर्ण होता कर्तव्ये..।
कोण कुठला तू,
ऐसे वरतुनी पुसे..।।

नका ठेवू बुटकी,
ऐसी आपली मती..।
नाठाळांच्या माथी,
अंती अधोगती..।।

गाठोडे जाईल कदाचीत,
पण शहाणपण येईल..।
तेचं जीवनात तरण्याचं,
तारु देवून जाईल..।।

रो..

बीज..
होरपळूनी जाता बीज,
न फुटे कोंब सुबक..
आंजारा गोंजरा निजवा,
ओल्या मातीच्या कुशीत..।
नका खुडू त्याचे,
अंकुरण्याचे स्वप्न..
हवी हक्काची ऊब,
अन् अलगद जपणं..।

माळीयाच्या हातानेही,
ते भरुन पावेल..
कुंडीतल्या बोनसाॅय परी,
रुप त्याचे असेल..।

खुलवा फुलवा हसवा,
मोकळ्या निर्मळ विश्वात..
माया ममता जिव्हाळ्याचा,
द्या हलकेचं हात..।

कृतज्ञता मांगल्याची,
त्याच्या डोळ्यात दिसेल..
फिटता उपकार मातीचे,
आकाशी झेपावेल..।।

रो..

ज्योत.. 
निरंजनाची ज्योत देतसे,
हलकासा प्रकाश..।
त्या प्रकाशात वसतसे,
मूक पवित्र विश्वास..।।
त्या विश्वासाने उजळतसे,
अंतःमनाचे आकाश..।
ऐश्या मनातचं असे,
सुखाचा अधिवास..।।
रो..

स्वप्ने..
जागेपणीची स्वप्ने जागी करुनी गेली,
मन पोखरणारं सत्य हलके वदूनी गेली..।
सत्य असे सारे की सारे असे भास,
स्वप्ना मागील स्वप्ने उद्विग्न करुनी गेली..।

क्षितीजाचे अस्तित्व तरळे कितीदा नयनी,
माझीचं वाट मजला सहज अडवूनी गेली..।

विस्मृतीत गेल्या स्मृती बंद झाली कवाडे,
स्मृतींची कवाडे उगाचं उघडूनी गेली..।

ह्रदयास बोचते काही हेलावे अंतःह्रदय,
ह्रदयास खिन्नता सखोल वेढूनी गेली..।

आळविते कशास्तव कोणते हे गीत,
गीतातील लयही पुरती विरुनी गेली..।

असे देह नश्वर कशास उगा आसक्ती,
जीवनास मरणाचे सत्यचं सांगुनी गेली..।।

रो..

बुटकी वृत्ती..
कधी कधी खरचं,
काहीचं कळत नाही..
बुटक्या वृत्तीपुढे,
आपलं काहीचं चालत नाही..।।
दुसर्यास म्हणतात,
अर्ध्या हळकुंडाने पिवळे..
स्वतः पाळतात मात्र,
सारे सोवळे ओवळे..
यांच्या गतीपुढे,
आपली मती चालत नाही..।
बुटक्या वृत्तीपुढे,
आपलं काहीचं चालत नाही..।।

जगही त्यांना हवं असतं,
स्व सौख्याप्रमाणे..
मीचं फार दिलदार,
ऐसे असे लबाड गाणे..
त्यांच्या सुरां सोबत,
आपला सुर जुळत नाही..।
बुटक्या वृत्तीपुढे,
आपलं काहीचं चालत नाही..।।

स्वतःचा तो बाळ्या,
दुसर्याचं ते कार्ट मानतात..
सभेत छातीठोकपणे,
आपलाचं हेका दामटतात..
त्यांच्या ह्या वृत्तीपुढे,
मस्तक झुकल्याशिवाय रहात नाही..।
बुटक्या वृत्तीपुढे ,
आपलं काहीचं चालत नाही..।।

खरचं आपलं काहीचं चालत नाही..।। 😢
रो..

शब्द..
शब्दांना असतात नेहमी,
असंख्य अर्थांची पुटे..।
ते नाही येत कधीचं,
नुसते एकटेदुकटे..।।
छंदोबध्द असले तरीही,
असतात आशयगर्भ..।
ज्याचे त्याने शोधायचे,
त्यामागील मर्म..।।
नाकारु नका कधीचं,
कोणत्याही शब्दाला..।
एकांताचे असतात सोबती,
देती आधार जीवनाला..।।
हे कवनही असे शब्दांचे,
शब्दांनी निर्मिलेले..।
आदरयुक्त कृतज्ञतेने,
शब्दांनाचं अर्पिलेले..।।
रो..

माती..
स्थिर असुनीही उत्कट,
मातीसारखं असावं..।
पावसाच्या थेंबाला,
वरचेवर झेलून घ्यावं..।।
हसावं फुलावं,
सहज रुजत जावं..।
चैतन्यानं उचंबळत,
निर्मितीचं गीत गावं..।।

रो..

जिवंत थडगे..
त्या तीन माकडांनी सांगितलं..
बुरा मत देखो..
बुरा मत सुनो..
बुरा मत कहो..
हो, आम्ही त्याचचं पालन करतोय..
अन्
पाहतोय,
निरागस डोळ्यांतील दयनीयता..

ऐकतोय,
आर्त किंकाळी ह्रदयभेदक..

बोलतोय,
सुमधूर गोष्टी अर्थहीन..

कारण त्या तीन माकडांनी सांगितलंय..
म्हणूनचं आम्ही बनत चाललोय..
सारे काही दिसत असूनही,
पुरते आंधळे..

सारे काही ऐकू येत असूनही,
ठार बहिरे..

सारे काही उमगत असूनही,
शब्दहीन मुके..

एक जिवंत संवेदनहीन थडगे..।।
रो..

सुंदर सकाळ..
काळोख लागता प्रकाशू,
उजळतसे पहाट..
गाणे गाती दिशांचे,
फिरते सृष्टीचे भाट..।
मंद लहरीत त्या,
उघडे आकाश खिडकी..
लाजे किरणांची प्रभा,
होवूनिया सोनसखी..।

दिली अवचित कोण्या,
कोंबडंयाने बांग..
जागे झाले चराचर,
आली सृष्टिलाही जाग ..।

फेर धरती दिशा,
गाणे गाती भूपाळी..
दान पावलं वासुदेवाचं,
ऐश्या सुंदर सकाळी ..।।

रो..

कवच..
उसळणार्या ज्वालामुखीवर,
फक्त एक कवच..
सौहार्दपूर्ण,
समतेचं..।
बाकी आत सारं,
जसच्या तसं..
धगधगणार,
चिरशांत..।।

रो..

अनवाणी
खूपदा निघाले,
अनवाणीचं..
आतुरतेने..
वेशीपर्यंत पोहचलेही,
पण,
गावात प्रवेशतांना,
पाय रक्ताळले..
तूचं पसरलेल्या,

काट्यांनी..।।
रो..

समांतर..
दोन समांतर रेषा..
ह्या बिंदूपासून त्या बिंदू पर्यंत,
एकसाथ वाढणार्या,
घटणार्या,
चालणार्या..
पण,
कधीही एकसंघ न होणार्या..
इथे,
तिथे,
भासमान प्रतलाच्या भासमान पट्ट्यावर,
अवघ्या विश्वतलावर,
कुठेही..

अवकाशाच्या प्रतलातून येणारी,
एक अबोल प्रकाशरेषा..
झक्कन चमकून
गेली छेदून
दोहोनांही
होवूनी छेदीका..

बदलले चित्र..
प्रतलाचे
विश्वाचे अन्
समांतर रेषांचेही ..

रो..

काश्मीर .. 

सोसवेना आता,
उन्हाची काहीली..
आठवे मजला,
काश्मिरी नवलाई..।
पुन्हा निनादती,
घोड्यांच्या त्या टापा..
वाकड्या वळणाच्या,
वाकड्या वाटा..।

गुलाबांच्या बागा,
अन् ते शुभ्र झरे..
साद घालिती,
सतत ते शिखारे..।

केशर बदामाची,
खैरात वाटली..
काश्मिरी पुलावीची,
मजाचं न्यारी..।

पांढर्या शुभ्र बर्फाची,
थंडगार दुलई..
पृथ्वी वरील स्वर्गाची,
जाणिव तिथे होई..।

ऐसा कैसा निसर्ग,
तिथे पहुडला..
दोहो हस्ताने तिथेचं,
गारवा उधळला..।

तनू असे स्थिर,
मन तिकडे धावे..।
शितलतेच्या छायेत,
पुन्हा वाटे जावे..।।

रो..

शुभंकर..
सार्या चैनी परवडतात,
वेळेची चैन परवडत नाही..
आयुष्य पुन्हा पुन्हा,
मागे फिरुन येत नाही..।
डोळीयात तेल घालून,
जपा प्रत्येक क्षणाला..
परतुनी न येण्याचा,
शाप आहे त्याजला..।

अहंकाराच्या धुंदीत,
नका रिझवू मनाला..
वाणीत मधुगोडवा,
कतृत्व लावा पणाला..।

जगा स्वतः आनंदाने,
जगू द्या दुसर्याला..
आनंदाच्या प्रासादात,
सामील करा जगाला..।

जगचं होईल नंदनवन,
सहज सुंदर नेटके..
कुणाचेही जीवन मग,
राहणार नाही फाटके..।

सार्यांच्याच कवेत येईल,
आनंदाचे गौरीशंकर..
प्रत्येक क्षणचं गात राहील,
शुभंकर शुभंकर..।।

रो..

माझं अस्तित्व.. 

तुकड्या तुकड्यात विभागलेलं,
माझं अस्तित्व..
जोडू पहातेय,
एकसंघपणे..
पण,
जाणवतयं सतत,
छिन्नविच्छीन्न होतेयं पुन्हा..
विखुरलेल्या तुकड्यातील,
नगण्य अणूसारखं..।।

रो..

गर्दितील एकटेपणा,
अन्
एकटेपणात गर्दि,
अनुभवायची असेल तर,
जत्रा भरावीचं लागते,
जनातही
अन्
कधी मनातही..।।
रो..

उन्हाळा..
अजिंक्य उन्हाळा,
आतमध्ये लपलेला..
सुखद सावलीसाठी,
जीव आसुसलेला..।
हलक्या झुळकीने,
पडत नाही भूल..
म्हणूनचं गोठलं नाही,
आतलं हसरं मूलं..।।

रो..

जाणावे..
झोकूनी द्यावे ऐसे,
असावे ठिकाण..
विशुद्ध आनंदी ऐसे,
असावे मर्मस्थान..
जाणावे जी..।
विचाराने स्वतंत्र ऐसे,
असावे जगणे..
जोखडातूनी मुक्त ऐसे,
असावे विहरणे..
जाणावे जी..।
माणुसकीचे सत्व ऐसे,
असावे सांधणे..
परम कल्याण ऐसे,
असावे त्यागणे..
जाणावे जी..।
भक्तीचे ठाण ऐसे,
असावे निधान..
जीवनाचे सार ऐसे,
व्हावे पावन..
जाणावे जी..।।
रो..

कधी दिस कधी रात..

 पेरणी करण्याआधी,
घ्यावे तपासोणी,
किती पोषकद्रव्ये,
मातीमध्ये..।

बीजाचे परीक्षणही,
करावे सकळ,
मर्म दृष्टि ठेवोणी,
चित्तामध्ये..।

वार्याचीही चाहूल
घ्यावी ती जोखून,
ठेवू नये कसूर,
प्रयत्नामध्ये..।

बाजाराचाही भाव,
घ्यावा समजोणी,
उमज पडत जाई,
कृतीमध्ये..।

इतकेही करोनी,
ना नशीब दे साथ,
करु नये खंत,
मनामध्ये..।

पुढे पुढेचं रहावे,
ठाशीव चालत,
कधी दिस कधी रात,
जीवनामध्ये..।।

रो..

दंश..
होतात कधी कधी,
विषारी दंश..
कितीही करा उतारा,
राहतातचं अंश..।
विषचं असे ते,
सरसर चढे..
औषधाची मात्राही,
तळाला दडे..।

विषचं आता,
मिरवू लागलयं..
औषधाला मात्र,
पंगुत्व आलयं..।

पंगुत्वातही औषध,
आहे समाधानी..
विषाची अवस्था,
आतून केविलवाणी..।।

रो..

आभार..
शब्दांना जर हवी असेल,
तलवारीची धार.. ।
तर करावा प्रथम ,
भित्रेपणाचा धिक्कार..।।
सत्कृतीने छेडत जावे,
हृदयाची तार..।
सत्याचाचं पदोपदी,
करावा स्वीकार..।।

अशक्यप्राय बाबीही मग,
देतील रुकार..।
गांजलेल्यांचे निःशब्द हुंकार,
मानतील आभार..।।

रो..

आपलं - परकं

आपलं कोण परकं कोण,
काहीचं कळत नाही..
गोतावळ्याचा गुंतावळा,
काही केल्या सुटत नाही..।
आपले म्हणावे तेचं,
झिडकारुनी सहज जाती..
परके कधी कधी,
हळुवार मनास जपती..
भावनांच्या कोडगेपणात,
अंकुर काही फुटत नाही..।।
आपलं कोण.......

हळवेपणाची पडझड होई,
अपेक्षांच्या ओझ्याखाली..
परकेपणाचे माप घेई,
अंतरंगाची नितळ खोली..
संवेदनांच्या बोथटपणाला,
जाणिवा स्पर्शत नाही..।।
आपलं कोण..........

वेदना वंचना घेवून,
नियती हसत येई..
धिक्काराणे मन पुरते,
कोमेजून निर्माल्य होई..
सोसल्याशिवाय आघातांना,
शहाणपण येत नाही..।।
आपलं कोण........

रो..

रडगाणे..
संवेदनाचं गुळगुळीत झाल्या,
नर्मदेच्या गोट्यासारख्या..
जिकडे ढकलेल पाणी,
तिकडे जाणार्या..
नाहीतर ढिम्म,
तळाला विसावणार्या..

कुणी फांदीला कवटाळो,
कुणी गॅलरीस लटको..
कुठे होवो बलात्कार,
कुठे चालो तीक्ष्ण हत्यार..

माझे झाले,
जग बुडाले..
ना देणे घेणे,
हे रोजचेचं रडगाणे..

ती केवळ एक हेडलाईन,
ब्रेकिंग न्यूजची..
एक बातमी,
पहिल्या पानावरची..

आजचा पेपर,
उद्या रद्दी..
कुणाचे आक्षेप,
कुणाची चंदी..।।

रो..

कळ्यांनो..
कळ्यांनो,
उमलूचं नका गं..
तुम्ही उमललात,
फुललात,
बहरलातं की,
कुणीतरी खुडेल तुम्हाला,
किंवा खुडू द्यावे लागेल,
आम्हाला,
नाकर्तेपणाने..
मग ते जोपासतील की,
कुस्कारतील.. ????
सारखीचं द्विधावस्या,
एक अस्वस्थ तटस्थता..
नको नकोचं ती.......
त्यापेक्षा,
नकाचं उमलू गं..
रहा गप्पगार,
निवांत - शांत..
अन् असू द्या आम्हासही,
तुमच्या उमलण्याच्या प्रतीक्षेत,
कायमचं..।।
रो..

गुच्छ.. 
चांदण्यांचा गुच्छ..
जातोयेस तर जा
नाही तरी कशी म्हणू ?
पण,
जाता जाता
सोबत घेवून जा
हा सुगंधी,
चांदण्यांचा गुच्छ..।
आलीचं कधी आठवण
तर,
एकचं घे संमुख
ती देईल तुला,
सुगंध सुखद क्षणांचा
अन्
हसेल तुझ्यासवे,
निर्मळ आनंदाने..।।

रो..

दिवस
 आयुष्यातले दिवस,
भराभर पुढे पळतात..
एखाद्या शर्यतीतल्या
घोड्यासारखे..।
आपण मात्र असतो,
मागेचं कुठेतरी रेंगाळत..
अस्तास निघालेल्या,
संधिप्रकाशासारखे..।।

रो..

डंख.. 
 कशाला करायचा,
फुकाचा शंख..।
सोसावेचं लागतात,
छोटेमोठे डंख..।।
मत्सराचा गाभारा,
ठेवायचा निरंक..।
ध्येयाकडे झेपवायचं,
पसरुनी पंख..।।

रो..

भाव..
काल परवा,
वर्तमानपत्रात वाचलं..
पेट्रोल डिझेलचे,
भाव वाढले..।
खूप शोध घेतला,
तेव्हा कळलं..
शब्दांचे भाव,
आभाळाला भिडले..।।
रो..

पुस्तक..
चला पुस्तक वाचू या,
आनंदाने शिकू या..।।
पुस्तके आमची छान छान,
कव्हर लावूनी ठेवू मान,
पुस्तकाचे रक्षण करु या..।।
चला....
आम्ही आहोत जरी लहान,
पुस्तकाने होईल दूर अज्ञान,
पुस्तकांशी दोस्ती करु या..।।
चला....
पुस्तकात आहेत गोष्टी छान,
देतात आम्हा जगण्याचे भान,
माणुसकी मनात रुजवू या..।।
चला....
रो..

बहाणे.. 
तिने,
सरपण रचले..
गोवर्या झाकल्या..
अंगणाला हलकेसे खराटे मारले..
हे सारे,
कामाचे बहाणे होते..
खरे तरं तिला,
पावसात..
चिंब भिजायचे होते..
काहीली सोसलेल्या मनाला
तृप्त करायचे होते..।।
रो..

पीठ 

आयत्या पीठावर रेघा ओढण्यास,
फारसा वेळ लागत नाही..
पण पीठ कसं तयार करायचं,
हे कधीचं कळत नाही..
साठवून जपलेलं पीठही,
एक दिवस संपून जातं..

भीक मागण्यासाठी मग,
हाती कटोराही रहात नाही..।।

रो..

पाखरु.. 

आकांतानं दिशा धुंडाळत,
फिरतयं पाखरु चोहीकडे..।
भिरकावूनी देती त्याजला,
स्वार्थीयांचे देखणे कडे..।।
वादळी झंझावात पाहूनी,
पंखात त्याच्या कापरे भरे..।
दांभिकतेची दुनिया सारी,
न्याय-निवाडा मौन धरे..।।

रो..

अस्तित्व.. 

आयुष्यचं क्षणभंगुरत्व,
प्रत्येकाला कळतं..।
तडजोड स्वीकारतांना,
तरीही मन काहुरतं..।।
आक्रोशाचं मैदान,
साधंसोप्प नसतं..।
तेही पार करत करत,
अखेर अस्तित्व उरतं..।।

रो..

ठिणगी

विझूनी जाईल एक ठिणगी,
ठिणग्यांचं पीक यावं..।
माजलेलं ओंगळ रान,
क्षणात जळून खाक व्हावं..।।
रुजावे कोंब नव्याने,
रान हिरवं व्हावं..।
हसर्या खेळत्या गुंजारवांचं,
नंदनवन फुलावं..।।

रो..

आत्मानंद..
एकांतात रंगे,
जीवाशिवाचा संवाद..।
आत्मानंदात धुंद,
अहाहा आत्मानंद..।।

शब्देवीणा संवादाची,
मैफल अमृततुल्य..।
आत्मानंदात धुंद,
अहाहा आत्मानंद..।।

क्षणाक्षणात चैतन्य,
अंतःमनाचा वेध..।
आत्मानंदात धुंद,
अहाहा आत्मानंद..।।

जुळे नाते दिव्यत्वाशी,
व्यष्टी समिष्टीचा मिलाप..।
आत्मानंदात धुंद,
अहाहा आत्मानंद..।।

आपलाचं संवाद आपल्याशी,
होई संवादात धुंद..।
आत्मानंदात दंग,
अहाहा आत्मानंद..।।

रो..

चौकट
 चौकट घातली आहे,
स्वतः भोवती अन्
बांधून घेतली आहेत
झापडं,
गच्चपणे डोळ्यांवर,
कारण..
उघड्या डोळ्यांनी,
पहावत नाहीत
क्षणाक्षणाला होणारे,
जालियवालाबाग हत्याकांड..।
रो..

अंहकार.. 

अंहकार करी
ऐसा बडेजाव
महत्व सिद्ध कराया
करे काहीही..।
लांडी लबाडीही
नसे तेथे वर्ज्य
शक्ती, उर्जा फुकाची
उधळूनी जाई..।
तुडविली जाती
मूल्य संस्कार
माणुसकीचा लवलेश,
स्पर्शत नाही..।
दिखाव्याचे चेहरे
दांभिकापुरते
सुखविता अंहकार,
प्रसन्नचित होई..।
आपणचं जोखावी
अंहकार मर्यादा
कुठेही प्रगटता
सर्वनाश होई..।।
रो..