मंगळवार, २४ मे, २०११


भेटी


प्रत्येकाला एक स्वप्न हवं असतं
जागेपणी पाहण्यासाठी,
अपूर्ण राहूनही,आनंद देण्यासाठी..

प्रत्येकाला एक ठिकाण हवं असतं 
हरवून जाण्यासाठी,
हरवूनही पुन्हा तिथूनच गवसण्यासाठी..

प्रत्येकाला एक प्रतिबिंब हवं असतं 
स्वत:त डोकावण्यासाठी,
आतल्या आवाजासह स्वत:ला निरखण्यासाठी..

प्रत्येकाला स्वरंग हवा असतो 
इंद्रधनुत मिसळण्यासाठी,
मिसळून पुन्हा निरभ्रतेकडे नेण्यासाठी..

प्रत्येकाला आकाश हवं असतं 
मुठीत सामावण्यासाठी,
स्वत:च नसलं तरी आपलं म्हणण्यासाठी 

प्रत्येकाला विसावा हवा असतो 
प्रतीष्टेच ओझ उतरवण्यासाठी,
ओझ उतरून खूप लहान  बनन्यासाठी..

प्रत्येकाला चांदण हवं असतं 
स्नेहात निथळण्यासाठी,
अंधाराचा संपवून प्रवास,प्रकाशाकडे नेण्यासाठी 

प्रत्येकाला हवं असतं असं काही काही
सर्वांनाच सर्व मिळतं असं होत नाही..

पुर्णत्वातही अपूर्णत्व ठेवितो तो ईश्वर पाही 
लीला त्याची अगाध ह्या जगती संपत नाही..

त्यालाही लागते कधीतरी पूर्णत्वाची आस 
पवित्रतेचे बंधन घालूनी नात्यात गुंफितो ध्यास..

त्याची आस त्याचा ध्यास होतो त्याचाच श्वास 
भेटी घडवितो भाग्यवंताच्या तोच भूवरी खास..
         तोच भूवरी खास..
     



शुभेच्छाफुलांची आपली पखरण
तृप्त न्हाले माझे अंत:मन
देऊनी मजसाठी एक क्षण
सुगंधित केले माझे जीवन..

गुलाब,निशिगंधाचा सुगंध उधळीला
आनंदाचा आपण वर्षाव केला 
शब्दफुलांची मी गुंफिली माला
 आभार कसे मानावे कळेना मज 
 बापडीला ..  

सोमवार, २३ मे, २०११

[ATcAAABSFOCT8RPKV2CoJ0P-P4_w64BCGPOb4T3zGgOsfRHLz052jqChxu2nzRgTh1NqePkV44QPBqZytY7Y1Bh4FZ_eAJtU9VBRDdeI-7cX7z9USoJ-m4AZB-jUIQ.jpg]

''डोळे -ओले''

हसशील भविष्यात कधीतरी
आठवणी आपल्या आठवून
किती केला वेडेपणा आपण
एकमेकांना मनात साठवून..

हा वेडेपणा नाही बरं का
ही तर भावनांची लाट आहे
हृदयाने हृदयाला दिलेल्या 
साद प्रतीसादाची बरसात आहे.. 

स्वाती नक्षत्राने दिलेल्या थेंबाची 
शिंपल्याने केलेल्या समर्पणाची 
मैत्रीच्या नात्याला मोत्याची 
हवीहवीशी सस्नेह भेट आहे.. 

क्षणांनी क्षणांना दिलेलं ते 
अस्मितेचं देण आहे
बाकी नाही ठेवलं काहीही 
हे तर प्रेमरुपी मैत्रीचं लेणं आहे.. 

आठवतांना सारे काही
खळखळून हसशील बरे
खळखळून हसतांना डोळे तुझेही 
नक्कीच होतील ओले
  होतील ओले...

"रंग"
एका एकांत क्षणी ,
आपण खूप अस्वस्थ होतो..
आपलंच सार असूनही 
खूप खूप उदास होतो..
जीवनातले सर्वच रंग, 
खूप सुरेख असतात..
पण हे प्रेमाचे,
रंगच असे असतात..
सर्व रंग त्या पुढे,
जणू फिके पडतात..
तू फक्त साद घाल,
प्रतिसाद नक्कीच मिळेल..
प्रेमाचे मेघ,,
ओतप्रोत भरले आहेत..
बघ पाऊस ही,
नक्कीच बरसेल..        

शनिवार, २१ मे, २०११

"पाऊस-आठवणी"
पाऊस...!
डोंगरमाथ्याला दडवणारा
वाटांना लपवणारा 
दरीला ओलाचिंब करणारा 
अंतरंगाला उल्हासित करणारा
धरीत्रीस मृदगंध राखण्यास 
भाग पाडणारा 
असा हा सृष्टीसंगे, 
भावनांना खेळवणारा 
पाऊस.. 

आठवणी..
अवचित कोसळणाऱ्या 
पावसासारख्या
मनात जिव्हाळ्याचा
ओलावा जपणाऱ्या
भावनांच्या अंतरंगांना
हेलावून सोडणाऱ्या 
विसरायचं म्हटल तरी,
विसरता न येणाऱ्या 
कधीच..          


वाट..
वाट वळणाची असली  की,
खूपसं चांगलं असतं..
कारण वळून गेलं की,
मागचं काही दिसत नसतं..
अन पुढचं पाहण्याचं,
मात्र औस्तुक्य असतं..

सरळ वाटेचं दु:ख मात्र,
अगदी निराळच असतं..
तिचं तिलाच ते ठाऊक असतं     
मागचं तर सोडता येतचं नाही,
अन पुढे मात्र सारखं लक्ष ठेवावं लागतं..

प्रेम  
 

प्रेम असे केवळ प्रेम सारखे
प्रेमासारखे जगी काही नाही
दोन होतात पूर्ण प्रेमामूळे 
परि अडिचाकड़े धाव पाही...


माणूस म्हणूनी पूर्ण होतो प्रेमाने
अन अपूर्णतेची गोडी चाखतो नेमाने
पूर्ण विकसित होवूनीही  विकासाची मागतो वचने 
असे हे प्रेम मिळते ईश्वरी दयेने... 

अहंकार सरता  जीवनी प्रेम दिसे ठायी ठायी 
प्रेम  जाणवण्याची क्षमता येता ईश्वरही येई ह्रुदयी 
कुसूम प्रेमाचे मिळता मग जीवन कृतार्थ होई 
कितीही मिळाले  तरीही आत्मा प्रेमासाठी पुन्हा जन्म घेई...  

*..आपली मैत्री..*
 
 
आपली मैत्री ही स्तुती सुमनांचा,
वर्षाव करणारी नसावी..
चुकलच तर कान पकडण्याच अधिकार अन,
बरोबर असेल तर अनुकरण करण्याच स्वातंत्र्य देणारी असावी..

आपली मैत्री ही अस्तित्वाला महत्व अन,
सुखात सोबत मागणारी नसावी तर..
मैत्रीच्या अस्मितेला जपणारी अन,
दु:खात न मागता साथ देणारी असावी.. 

आपली मैत्री ही केवळ मैत्री नसावी,
समृद्धतेकडे नेणारी ती सुबक वाटचाल असावी..
त्यातून भावनिक,वैचारिक सुदृढतेची वेल बहरावी,
त्या वेलीला सुस्कांराची सुमने उमलावी..

त्या सुगंधाने अवघ्या जीवनास,
चैतन्याची संवेदना जाणवावी अन,
ती संवेदना शेवटच्या श्वासापर्यंत टिकावी,
अशी आपली ही मैत्री असावी..
मैत्री असावी..*   
    

मंगळवार, ३ मे, २०११

आपली माणसं

आपली माणसं जेव्हा आपली असतात 
तेव्हा आपण सर्व जगाचे असतो,
आपली माणसं जेव्हा आपली नसतात 
तेव्हा आपण आपलेही नसतो..

आपली माणसं जेव्हा आपली असतात 
तेव्हा अक्षरांनाही भावनांचे  धुमारे फुटतात,
आपली माणसं जेव्हा आपली नसतात
 तेव्हा महाकाव्ये ही रुसून बसतात..

आपली माणसं जेव्हा आपली असतात 
तेव्हा निष्पर्ण शाखेलाही पानफुटी होते,
आपली माणसं जेव्हा आपली नसतात
तेव्हा गुलाबाचे उद्यानही  कोमेजून जाते..

असे असते आपलेपणाचे नाते 
मानवी जीवनाला मुक्ततेकडे नेते,
जपावे लागते ते हृदयाच्या कोंदणात
घेऊन जाते आपणास सुखसागरात..

ठेवा मनी विश्वास आपलेपणावर
घेवू नका मनी शंका कुणीकुणावर,
आणू या स्वर्गच आपण या धरतीवर 
उत्कटतेने जगू या चला क्षण न क्षण..