शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११


अधिकार..

गुलाब नव्हतेच मागितले कधी, 
काट्यानशीच व्यवहार मांडला होता..
तू नको म्हणत असतानाही मी,
काट्यानशीच  करार केला होता..

गुलाब तू देण्याआधी 
कर माझे रक्ताळले होते..
काट्यांनी काट्यांचे काम केले,
म्हणूनच..
गुलाबही काटे भासले होते..

गुलाब दे अगर काटे दे, 
काय द्यायचे हा 
ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. 
मी मात्र काटेच घेणार,
कारण..
"स्वीकार"हा माझाच,
फक्त माझाच
अधिकार आहे....!!       

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

आकाश..

आपणचं करावं आपलं मोकळं आकाश,
अन सुसाट धावावं वेगात खुशाल..
कशाला हवी खंत कोण आहे पुढे,
मागे ज्यास यावयाचे त्यास येवूद्या बापुडे,
आपण रहावे मात्र आपल्याच जोशात..
अन सुसाट धावावे वेगात खुशाल..१

सोबत घ्यावे कुणीतरी आपल्यासारखेच खुळे,
ज्याच्यासंगे आपली विचारांची नाळ जुळे,
नाहीच आले कुणीतरी हट्ट नका करू बरे,
आपले आकाश आपले असते हेच खरे,
रंगून जावे आपण आपल्याच रंगात..
अन सुसाट धावावे वेगात खुशाल..२

प्रकाशेल आपल्याही आकाशात  इंद्रधनु, 
चला नाही तर,आपणच फुलपाखरू बनू,
रिमझिम पाऊस ही बरसेल आपल्या आकाशात,
पारिजातकाचा सडाही पडेल त्याच खर्जात,
अहंकाराचा पिळा मग कशाला ठेवायचा मनात..
अन सुसाट धावावे वेगात खुशाल..3