बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

असंग..
प्रतिमा उमटता,सर्वस्व लुटावे
प्रतिमा मिटता ,रिक्त हस्ते उरावे..
दर्पणासम मन ,असंग व्हावे
सुखदु;खाचे भार,उगा का वहावे..१
जलातील रेषेसम,नित्य असावे
उमटता जलातच ,विलीन व्हावे ..
दर्पणासम मन ,असंग व्हावे 
स्मृतीचे शिलाखंड ,उगा का वहावे..२
निरभ्र अंबरासम,प्रकाशित व्हावे
रोजच नूतन ,दिनास भजावे..
दर्पणासम मन, असंग व्हावे
अतिताचे ओझे ,उगा का वहावे..३
हिरव्या वृक्षासम,बहरत जावे
हसऱ्या कुसुमातुनी ,जीवन फुलवावे ..
दर्पणासम मन, असंग ह्वावे
स्वसंगासह क्षणांना, पुलकित करावे..४
 -रो.