रविवार, २४ फेब्रुवारी, २०१३

"शून्यत्वाच लेणं . .  "

वाटेवरच्या सावल्या 
अंतर्धान पावल्या  
माझ्यातल्या मीपणाला 
सोबत घेवून गेल्या।  
क्षितिजाच्या प्रकाशातून 
उडत आले पक्षी 
विस्कटून गेले
सुंदर रेखीव नक्षी । 
वल्हत गेल्या नौका 
अन त्यांची शिडे
 नि:शब्दपणे पहात राहिले 
घेतले नाही धडे। 
उजाड दिशा सावळी निशा 
फेडते प्रकाशाचे देणं 
माझ्यातल्या मीपणाला 
शून्यत्वाच लेणं ।  

"निर्दय फरपट..  "
पुढे पुढे जातांना
 थोडसचं थांबावं 
मागे वळून एकदा 
क्षणभर बघावं.. । 
 कुणीतरी येत असत
 हळू हळू मागून 
पाहिलं कधीतरी वळून 
ह्याची  जाणीव ठेवून..  । 
मागूनच येण्याचा
 घेतला असतो वसा 
जाणीवेच्या क्षेत्रातील 
तो अदभूत ठसा.. । 
 नाही वळून पाहिलं तरी
 बिघडत तसं काहिच नाही 
बिचाऱ्या जीवाची निर्दय फरपट 
दुसरे तिसरे काही नाही..  । 

"फोड "

 खूप खूप वाटतं 
कळीसारख फुलावं 
पाकळ्या पसरुनी 
आकाशाला भिडाव..।  
 कुठून येतात  मत्सराचे 
अवचित ध्वनी 
निराशेचा सूर घुमतो
 नकळत राजस मनी.. ।  
गर्दीतही राहून जाते 
माणूसपण एकटे 
उत्सवाचे क्षणही 
होऊन जातात थिटे..  ।  
टाकावं क्षणात संपवून
  एकदम सर्व काही 
कुठले जीवन कुठली आस 
कुठे काहीच नाही..  । 
उगीचची धडपड 
फुकाचीच उरस्फोड
 झाकळलेले मन 
काळजाला व्यथित फोड..  ।   

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१३

"सज्ज "
 पुन्हा एकदा कळी व्हावं
 फुलासारखं फुलून यावं 
आपलचं बालपण 
पुन्हा एकदा जगावं .. 
वार्यासंगे डोलावं 
फुलासंगे फुलावं
 निखळ हास्याचे 
तुषार शिंपित जावं ..
पावसांत भिजावं
 ओलेचिंब व्हावं
 हळूच कधी रुसून
 कोपर्यात बसावं ..
कुतूहल जागवून
 इंद्रधनू पाहावं
 गरकन गिरकी घेऊन 
भिंगोर्या खेळावं ..
आपल्याच अंकुराच
 रोप होतांना पाहावं 
मन:स्पर्शी संवेदनांनी 
 स्वागताला सज्ज व्हावं ..